नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए)अध्यक्षपद सोपवण्यासंबंधीच्या चर्चाना सध्या उधाण आले आहे आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील सध्याची परिस्थिती पाहता शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीदेखील पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यूपीएचे अध्यक्षपद म्हणजे काही पंतप्रधानपद नाही. त्यामुळे हे पद स्वीकारण्यास पवार स्वत:च तयार असतील असे आपल्याला वाटत नाही, असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा यूपीएचे घटक पक्ष एकत्र बसतात त्यावेळी मोठ्या गटाचा नेता बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारतो. हे पद म्हणजे काही पंतप्रधानपद नाही, त्यामुळे हे अध्यक्षपद स्वीकारण्यास पवार तयार होतील असे आपल्याला वाटत नाही, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
यूपीएचे अध्यक्षपद अशी कोणती चीजच अस्तित्वात नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. जेव्हा यूपीएची बैठक बोलावली जाते त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचा नेताच मोठ्या गटाचा नेता म्हणून या आघाडीच्या अध्यक्षपदी असतो. अध्यक्षपदापेक्षा यूपीए आघाडी मजबूत होणे याला अधिक महत्त्व आहे. संपूर्ण देशात ही आघाडी मजबूतपणे उभी राहण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले की, यूपीए आघाडीतील कोणताही घटक पक्ष यूपीएची बैठक बोलावू शकतो. त्या बैठकीला कॉंग्रेसही उपस्थित राहील, पण कॉंग्रेस जेव्हा ही बैठक बोलावेल त्यावेळी नैसर्गिकरीत्या कॉंग्रेसचा नेताच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो असे त्यांनी म्हटले आहे. सध्या यूपीएमध्ये 9 ते 10 पक्ष आहेत.