हडपसर येथे आघाडीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्णय
हडपसर – हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्या विरोधात तगडा उमेदवार असावा, काय रणनीती आखावी यासाठी हडपसरमधील आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत “आघाडीतून जो द्याल, तो उमेदवार आम्ही आदेश समजून जास्तीत-जास्त मतांनी निवडून आणू,’ असा विश्वास पदाधिकारी यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
आघाडीच्या जागावाटपामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटला आहे. पण, अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. येथून अनेक जण इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी “भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद या मतदारसंघात मोठी आहे. आता ही ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.
गेल्यावेळी आपण वेगवेगळे लढल्यामुळे भाजपला फायदा झाला. यंदा मात्र आपण एकत्र आहोत आणि एकत्र प्रचार करणार आहोत. सध्या शरद पवार हेच उमेदवार समजून हडपसरमध्ये आघाडीचा उमेदवार विजयी करायचा,’ असा निश्चय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.