शरद पवार केवळ माझे वडील नसून बॉसही

सुप्रिया सुळे: अजितदादांबाबत पक्ष निर्णय घेईल

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित कार्य करण्याची दिलेली ऑफर नाकारल्याचा गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खासदारकन्या सुप्रिया सुळे यांनी त्या घडामोडीबाबत मिस्कील प्रतिक्रिया दिली. पवार हे केवळ माझे वडील नसून बॉसही आहेत आणि बॉस नेहमीच बरोबर असतो, अशी टिप्पणी सुप्रिया यांनी केली.

पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. त्यापार्श्‍वभूमीवर, सुप्रिया एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. पवार आणि मोदी यांच्यातील बैठक म्हणजे ज्येष्ठ नेत्यांची भेट होती. त्या बैठकीला मी उपस्थित नव्हते. मोदींनी ऑफर दिलीच असेल तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. मात्र, माझ्या वडिलांनीही त्या ऑफरला नम्रतापूर्वक नकार दिल्याचे आपण ऐकलेच असेल, असे त्या म्हणाल्या.

अजित पवार यांचे कथित बंड म्हणजे एक दु:स्वप्न होते. डोळे उघडले की स्वप्न संपते, अशी भावना यावेळी सुप्रिया यांनी व्यक्त केली. अजितदादांना माफ करणार का, या प्रश्‍नावर त्या उत्तरल्या, कुटूंबातील सदस्य एकमेकांच्या पाठिशी उभे राहणार नाहीत तर कोण? माझ्या मुलांनी चूक केली असती तर त्यांचे कान पकडण्याचा अधिकार मला आहे. मात्र, अजितदादा माझे मोठे भाऊ आहेत. त्यांना माझे कान पकडण्याचा अधिकार आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

नव्या सरकारमध्ये अजितदादांवर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे. त्याविषयी विचारल्यावर सुप्रिया यांनी पक्ष निर्णय घेईल, असे उत्तर दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.