नाशिक – शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आज नाशिकमधून सुरूवात झाली आहे. मात्र, पक्षाचे अध्यक्ष नाशिकमध्ये दाखल झाले असताना, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र पवारांच्या बैठकीस अनुपस्थिती दर्शवली आहे. छगन भुजबळ हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पवारांच्या नाशिक दौऱ्यापेक्षा जास्त भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ राष्ट्रवादाली सोडचिठ्ठी देणार असल्याच्या आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यावरून अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच भुजबळांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
सध्या छगन भुजबळ हे काँग्रेस -राष्ट्रवादीच्या जागा वाटप संदर्भातील बैठकीसाठी मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून समीर भुजबळ हे शरद पवारांच्या बैठकीस उपस्थित आहेत. मात्र, तरी देखील छगन भुजबळांची पवारांच्या दौऱ्यादरम्यानची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.