कोल्हापूर – राज्यातील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस वाढत असतानाच दुष्काळावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरवात झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दुष्काळावरून जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दुष्काळावरून राज्य सरकारला घेरत टीका केली होती. त्यानंतर आज भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर देत, शरद पवार हे कोणतीही माहिती न घेताच दुष्काळावरून राजकारण करत असल्याची टीका केली आहे. राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे पवार यांच्यासारखे ज्येष्ठ आणि जाणकार नेतेच माहिती न घेता बोलू लागल्याने आपल्याला याची चिंता वाटत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने कोणतीही कसूर ठेवलेली नसल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी, दुष्काळ निवारणासाठी केलेल्या योजनांचा पाढाच यावेळी वाचून दाखवला.