नवी दिल्ली – आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
यासोबतच पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचीही घोषणा यावेळी पवारांनी केली आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित परांवर अन्याय झाला का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
अश्यातच आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील याच मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांना ‘अजित पवारांवर अन्याय झाला का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, “कोणावर न्याय अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती स्वतः बोलेल. बाहेरच्यांनी का बोलावं? त्यांचं वकीलपत्र त्यांनी कुणाला दिलंय का? भाजपला दिलंय का? की आम्हांला दिलंय? ते समर्थ आहेत. शरद पवार समर्थ आहेत. ते बोलतील..’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तसेच खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.