नवी दिल्ली – सीबीआय कारवाईनंतर आपच्या विरोधात निदर्शने करण्याच्या कॉंग्रेसच्या कृतीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. तसेच, मतभेद विसरून भाजपविरोधात एकवटण्याचे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर नुकताच सीबीआयने छापा टाकला. त्या कारवाईचा निषेध करत आपच्या समर्थनासाठी विविध विरोधी पक्ष पुढे सरसावले. मात्र, दिल्ली कॉंग्रेसने आपविरोधात निदर्शने केली. तसेच, सिसोदिया यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कॉंग्रेसच्या त्या कृतीबद्दल मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसविषयी नाराजी व्यक्त करणाऱ्यांमध्ये आता पवार यांचीही भर पडली आहे.
आपच्या पाठिशी उभे राहणे हे कॉंग्रेसचे कर्तव्य होते. कॉंग्रेसचे आपशी मतभेद असू शकतील. पण, विरोधी पक्षांचा खरा लढा भाजपशी, जातीयवादी शक्तींशी आहे. त्यामुळे जातीयवादी शक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ होईल असे कुठले पाऊल उचलले जाऊ नये, असे पवार मंगळवारी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत बोलताना म्हणाले.
देशात आणीबाणीच्या काळात पुढील 25 वर्षे काहीच बदलणार नाही अशाप्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अल्पावधीतच म्हणजे 1977 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सत्ताबदल घडवून दाखवला. सामान्य जनता सुज्ञ असते. ती 2024 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवेल, असे भाकीत त्यांनी केले.
केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि छत्तिसगढ या राज्यांत भाजपची सत्ता नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांत फोडाफोडी करून तो पक्ष सत्तेवर आला. तशाप्रकारच्या कृती जनतेला रूचत नाहीत. विरोधी पक्षांनी मतभेद बाजूला ठेऊन एकत्रितपणे कार्य करावे. त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही पवार यांनी दिली.