“शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ झालं की त्यांना सगळे माफ असतं”

सदाभाऊ खोत यांची पवारांवर खोचक टीका

सांगली : आमदार गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोकं टीव्हीसमोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार आहे. कारण गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त आहे, अशी स्तुतीसुमने माजी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकरांवर उधळली आहेत.

हिंदकेसरी पै.मारुती माने यांच्या 83 व्या जयंतीनिमित्त पै.भीमराव माने युथ फाऊंडेशन व हिंदकेसरी व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब कवठेपिरान यांचे वतीने व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या. यावेळी खोत बोलत होते. यावेळी नूतन सरपंच व उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारही आमदार खोत आणि पडळकर यांच्याहस्ते पार पडला. हॉलीबॉल स्पर्धांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा हॉलीबॉलचा सामना रंगला होता.

महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधात कुणी बोलायचेच नाही का? या राज्यात व्यक्तिस्वातंत्र्य आहे का नाही? का सरकार विरोधात कुणी बोलायचेच नाही का? असा सवाल यावेळी खोत यांनी केला. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मात्र काहीही बोलण्याचा अधिकार आहे. एकदा माणूस राजकारणामध्ये वयाने ज्येष्ठ झाला की त्यांनी काहीही केले तर माफ असतं, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जिरवा-जिरवीच्या राजकारणाला ऊत आलाय. तसंच जे विरोधात जातायत त्याच्या विरोधात कट कारस्थान करून मोठी मोठी कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे पाप महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहेत, अशी टीकासदाभाऊ खोत यांनी केली. दरम्यान,
सदाभाऊ खोत म्हणाले की, गोपीचंद बारका गडीय पण अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. लेनन गाडी कितीही मोठी असू द्या पण एवढ्या एवढ्या जॅकवर ती गाडी उचलली जाते, असे गोपीचंद पडळकराचे काम आहे, असेही खोत म्हणाले. आम्ही चुकून आमदार झालोय असे म्हणत खोत यांनी मला आमदारकी कशी मिळालीय हे सगळ्यांना माहीत असल्याचे सांगितले. ‘इडा पीडा टाळू आणि सदाभाऊंना आमदारकी मिळू दे’ असे मी आमदार झालोय, असे खोत म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.