“शरद पवार मोठे नेते आहेत म्हणून त्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात”; देवेंद्र फडणवीस यांची खोचक टिप्पणी

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय असे म्हंटले होते. त्यांच्या या  विधानानंतर राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. यावरून अनेकांनी फडणवीसांवर शेलक्या शब्दात टीकाही केली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांच्या वक्तव्यासंदर्भात दिली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

“गोव्यामध्ये भाजपाला प्रचंड मान्यता आहे. मनोहर पर्रिकरांची परंपरा येथे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील चांगले काम केले आहे. तसेच मोदींबद्दल देशामध्ये असलेली सकारात्मकता या सर्व गोष्टी एकत्र केल्यानंतर गोव्यामध्ये आम्हाला विजय मिळेल असा मला विश्वास आहे. यावेळी आमची पूर्ण बहुमताची तयारी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला बहुमत मिळेल आणि त्यासाठी आम्ही गेले काही दिवस तयारी करत आहोत, “असे फडणवीस म्हणाले.

“गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने विरोधी पक्षनेता म्हणून मी महाराष्ट्र उभा आडवा सगळा पिंजून काढला आहे. करोनामध्ये जेव्हा घरातून कोणी बाहेर पडत नव्हते त्यावेळसही मी मैदानात होतो. पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ अशावेळीही आम्ही लोकांमध्ये होतो. त्यामुळे ज्यांना सत्ता मिळवायची होती त्यांनी ती कशीही मिळवली. आता त्यावर लक्ष घालण्यापेक्षा ते ज्या प्रकारे सरकार चालवत आहेत आणि ज्याप्रकारे लोकांचा रोष आहे तो संघटित करण्याचे काम आम्ही करत आहोत,”असेही फडणवीस म्हणाले.

शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले नाही याची वेदना सलत आहे असा प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी याबाबत भाष्य केले. “शरद पवार मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही त्यांची वेदना त्यांच्या मनात सलत आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणात बोलाव्या लागतात. तुमच्या विरोधकांना उत्तरे द्यावी लागतात. सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे कुठल्याही पक्षाला वाटते पण आम्ही हातपाय गाळून बसलेलो नाही. विरोधी पक्षाचे उत्तम काम करत आहोत आम्हाला काही चिंता नाही,” असे फडणवीस म्हणाले.

आगामी पालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये भाजपा मित्रपक्षांना घेऊन पूर्ण ताकदीने या निवडणुकांमध्ये उतरु असे फडणवीसांनी सांगितले.

“आमचे मित्र तुम्हाला माहित आहेत. मनसेसोबत कुठलीही युती झालेली नाही. बाळा नांदगावकर युतीची बोलणी करण्यासाठी आले नव्हते. काही वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यासाठी ते आले होते,” असेही फडणवीस म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.