मनसेची ‘बहिष्कार’ भूमिका अमान्य – शरद पवार

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “ईव्हीएम’प्रश्‍नी देशातील अनेक नेत्यांशी भेट घेतली. माझीदेखील त्यांनी भेट घेतली. या दरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र, निवडणुका बॅलेट पेपरने घ्याव्यात. त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मनसेने मांडली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. दरम्यान, मनसेची ही भूमिका मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसेला आघाडीमध्ये घेण्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्यापपर्यंत झाला नसल्याचे पवार यांनी सांगितले. लोकसभेप्रमाणे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करून लढणार आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 120 अशा 240 जागांवर एकवाक्‍यता झाली आहे. उर्वरित जागा स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यासारख्या समविचारी पक्षांना दिल्या जातील. लवकरच या जागांवरील उमेदवार निश्‍चित करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

दुष्काळाकडे मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा
मुख्यमंत्री दुष्काळाकडे कानाडोळा करून प्रचाराकडे लक्ष देत आहेत, यावर बोलताना पवार म्हणाले, पक्षाचा प्रचार करणे यात काही गैर नाही. पण दुष्काळाबाबत जेवढी खबरदारी घ्यायला पाहिजे तेवढी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्तेमध्ये सहभागी असलेला शिवसेनेलाही नाराजी व्यक्‍त करून आंदोलन करावे लागले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.