‘सर्वोच्च’ निर्णयामुळे बाबासाहेबांचा सन्मान – शरद पवार 

मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कोणताही विलंब न करता उद्याच पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्यात यावी. व बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीने न करता त्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे महाशिवाघाडीच्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.

शरद पवार म्हणाले कि, राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! हा निकाल योगायोगाने संविधान दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 24 तासांचा कालावधी न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने बहुमत चाचणी सिद्ध करण्याची सर्व प्रक्रिया ही हंगामी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली करण्याचेही आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.