पुनावळे, ताथवडे पुलाच्या कामाची शरद पवार यांनी घेतली दखल

गडकरींना पत्र; भुयारी मार्ग पुलाची उंची वाढविण्याची मागणी

पिंपरी – पुणे-मुंबई महामार्ग (एनएच 4) वरील पुनावळे आणि ताथवडे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अंडरपास पुलामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यासाठी या पुलाची उंची वाढविण्याची आवश्‍यकता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली असून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत साकडे घालण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी दिली.

याबाबत मयुर कलाटे यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतचा ताथवडे भाग वेगाने विकसित होत आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या हिंजवडी आयटी पार्क मधून शहराच्या दिशेने रावेत, देहूरोड, प्राधिकरण, चिंचवड आदी भागात जाण्यासाठी नागरीक पर्यायी मार्गाचा वापर करतात. तसेच या परीसरामध्ये नामांकित शिक्षण संस्था आहेत. मोठ्या प्रमाणावर या भागात नागरीकरण झाल्यामुळे पुनावळे व ताथवडे येथील अंडरपास पुलाजवळ रोजच वाहतुकीची कोंडी होत आहे. पुणे-मुंबई द्रूतगती मार्गाचे काम झाल्यामुळे या रस्त्याची उंची वाढली आहे. तुलनेने या दोन्ही अंडरपासची उंची कमी असल्यामुळे अंडरपासमध्ये पाणी साचते. त्यामुळे वाहतूक ठप्प होते.

या दोन्हीही अंडरपासच्या पूलाची उंची वाढविण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा चालू आहे. परंतु, अद्यापर्यंत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबतची माहिती शरद पवार यांना दिली. त्यांनी तातडीने केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देत पुलाचा प्रश्‍न निकाली काढण्याची विनंती केली आहे, त्यामुळे हा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल, असा दावा मयुर कलाटे यांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)