मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या ठिकाणी धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी लढत होणार आहे. या ठिकाणी शरद पवारांनी राजेसाहेब देशमुखांना तिकीट देऊन मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे.
मराठा-ओबीसी पुन्हा संघर्ष होणार?
बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही समाज एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव बीड जिल्ह्यात आहे. त्याच बीडमध्ये शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांच्या रुपाने मराठा कार्ड खेळत मोठा डाव टाकला आहे. त्यामुळे परळीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगेच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव बीड जिल्ह्यात आहे. जरांगे यांचा मुंडे कुटुंबावर मोठा रोष आहे. येत्या विधानसभेला जरांगे राजेसाहेब देशमुख यांच्याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत राजेसाहेब देशमुख?
राजेसाहेब देशमुख यांनी अनेक वर्षे काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. तसेच त्यांनी बीड जिल्हा परिषदेत शिक्षण आणि आरोग्य सभापती पदही त्यांनी सांभाळले. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मागच्या महिन्यात राजेसाहेब देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना परळीमधून विधानसभेची उमेदवारी दिली आहे.