नवी दिल्ली : आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचीही घोषणा यावेळी पवारांनी केली आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वर्धापदिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी तसेच राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे म्हटले. तसेच आजपर्यंत म्हणजे २४ वर्ष मी पक्षाच्या माध्यमातून काम करत जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, शरद पवारांनी आपल्या भाषणाच्या शेवटी पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचीही घोषणा केली. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही साथीदारांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहोत” असे त्यांनी म्हटले. तसेच “मला विश्वास आहे की ही पूर्ण टीम सर्व सहकाऱ्यांना उत्साह देतील, लोकांमधला विश्वास वाढवतील आणि देशातल्या परिवर्तनात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निभावण्यासाठी आपली कामगिरी चोखपणे बजावतील”, असे शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुढील नेत्यांवर दिली ‘ही’ जबाबदारी
* प्रफुल्ल पटेल – मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी
* सुप्रिया सुळे – महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी
* सुनील तटकरे – ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग या जबाबदाऱ्या
* डॉ. योगानंद शास्त्री- दिल्ली सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी
* के. के. शर्मा – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंचायत राज विभाग
* फैजल – तामिळनाडू, तेलंगणा, केरळ
* नरेंद्र वानवा – सर्व पूर्वेकडची राज्ये, आयटी विभाग
* जितेंद्र आव्हाड – बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, लेबर विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभाग
* नसीम सिद्दिकी – उत्तर प्रदेश, बिहार, गोवा