भरूच – देशाने तुम्हाला दोन वेळा पंतप्रधान बनवले. आता आणखी काय मिळवायचे आहे? अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या एका बड्या नेत्याने मला काहीसे दमाने घेण्याचा सल्ला दिला. मात्र, आराम करण्याच्या कुठल्याही मुडमध्ये मी नाही, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी केले. त्यांनी संबंधित नेत्याचे नाव उघड केले नाही. मात्र, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुजरात सरकारने विविध घटकांना अर्थसहाय्य उपलब्ध करणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभार्थींशी मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या बड्या नेत्याने दिलेल्या सल्ल्याविषयीचा गौप्यस्फोट केला. संबंधित नेते राजकीयदृष्ट्या नेहमीच आमच्या विरोधात असतात. मात्र, मी त्यांचा आदर करतो. काही मुद्द्यांवरून नाराज असल्याने त्यांनी माझी भेट घेतली. दोन वेळा पंतप्रधान बनणे त्यांच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे. मात्र, माझी जडणघडण वेगळ्या पद्धतीने झाली आहे.
गुजरातच्या भूमीने मला घडवले आहे. त्यामुळे भरपूर मिळवले असे समाधान मानून आराम करण्याची माझी मानसिकता नाही. आता कल्याणकारी योजनांची शंभर टक्के पूर्तता हे माझे स्वप्न आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी भेट घेणाऱ्या नेत्याचा नामोल्लेख टाळला. मात्र, काही दिवसांपूर्वी पवार यांनी दिल्लीत मोदींची भेट घेतली होती. त्या भेटीत पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधातील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली होती. मोदी आणि पवार यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. त्यामुळे मोदींना सल्ला देणारे पवारच असावेत, असे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.