पुणे व्यापारी महासंघ : कर्जावरील व्याजमाफीचीही मागणी
पुणे – मध्यवस्तीतील दाट लोकवस्ती, अरुंद रस्त्यांमुळे व्यवसाय करणे कठीण आहे. यामुळे या बाजारपेठा शहराबाहेर विस्थापित करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. महासंघाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पवार यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्यासह इतर व्यापारी उपस्थित होते. राज्यात मुंबईनंतर सर्वांत मोठी बाजारपेठ पुण्याची आहे. व्यवसायाच्या बदललेल्या पद्धतीमुळे प्रदर्शने भरविणे ही काळाची गरज आहे. यासाठी निश्चित जागा मिळावी, “एसआरए’संदर्भातील कायदा सुटसुटीत करणे, माथाडी कायद्याखाली होणारी गुंडगिरी थांबवावी, लॉकडाऊन काळातील कर्जावरील व्याज माफ करावे.
व्यवसाय बंद असल्याने स्वाइप मशीनचे भाडे बॅंकांनी माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावर पवार यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना त्वरित लक्ष घालण्याचे आदेश दिले. याप्रसंगी सचिव महेंद्र पितलिया, सूर्यकांत पाठक, रतन किरड, सुभाष संघवी, राजेश शाह, मनोज सारडा, हेमंत शाह, जयंत शेठे, विपुल अष्टेकर आदी उपस्थित होते.