शरद पवार-डॉ. येळगावकरांच्या भेटीने चर्चेला उधाण

पवारांनी माजी आमदारांकडून घेतला सिंचन योजनांचा आढावा

वडूज – पडळ (ता. खटाव) येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खटावचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना जवळ बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पवारांनी खटाव-माणमधील शेती पाण्याच्या प्रश्‍नाबाबत येळगावकरांकडून माहिती घेतली, असे सांगण्यात येत असले तरी त्यांच्यात झालेल्या चर्चेमुळे तालुक्‍याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवारांनी आपल्या भाषणात राजकीय चिमटे काढत विरोधकांवर हल्लाबोल केला आणि आगामी राजकारणासाठी साखर पेरणीही केली.

पडळ येथील खटाव-माण ऍग्रो साखर कारखान्याच्या कार्यक्रमात पवारांसमवेत राष्ट्रवादी व अन्य पक्षांचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. खटाव-माणच्या शेतीपाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत दोन्ही तालुक्‍यांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन पवारांनी या सभेत दिले. या कार्यक्रमात पवार यांनी डॉ. येळगावकर यांना जवळ बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पवार यांनी मतदारसंघातील सिंचन योजनांची माहिती घेतली.

टेंभू योजनेचे पाणी मायणी तलावातून सोळा गावांसाठी मिळविले आहे. माण तालुक्‍यातील वरकुटे-मलवडी येथील महाबळेश्‍वरवाडी तलावातातून परिसरातील 16 गावांना पाणी उपलब्ध करून दिले आहे. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक तीनमधून माण, खटाव, आटपाडी तालुक्‍यातील वंचित भागांना पाणी देणे शक्‍य असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. यातून खटाव-माण तालुक्‍यांमधील सात हजार 326 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.

तारळी योजनेचे पळसगाव परिसरातील काम पूर्ण करून मायणी, चितळीपर्यंतच्या वंचित क्षेत्रास सिंचनाचा लाभ द्यावा. जिहे-कठापूर योजनेतून नेर, दरूज, दरजाई येथील तलावांद्वारे सातेवाडी, पेडगाव, एनकूळ, कणसेवाडी या भागाला बंदिस्त पाइपलाइनने पाणी देण्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून तो प्रस्तावही शासनाकडे प्रलंबीत असल्याचे डॉ. येळगावकर यांनी पवारांना सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here