Sharad Pawar Diwali Padwa | मागच्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या पवार घराण्याच्या दिवाळी पाडव्याचा सोहळा नेहमीच कौतुकाचा ठरत असतो. मात्र यंदा या पाडव्याच्या सोहळ्यात यंदा वेगळे चित्र आहे. बारामतीमध्ये यंदा शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. परंतु दिवाळी पाडव्याचे पारंपरिक ठिकाण असलेल्या बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी शरद पवारांशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “फांद्या छाटल्या गेल्या तरी मूळ हे मूळ असतं”, अशी भावना शरद पवारांना भेटण्यासाठी आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याने व्यक्त केली.
यावेळी शरद पवार गटाचे आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मेहबुब शेख यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “आम्ही दरवर्षी पवार साहेबांना पाडव्याला शुभेच्छा द्यायला येतो. त्यांना भेटून आम्हाला नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. दिवाळी पाडव्याला मी शरद पवारांना भेटायला येण्याचं यंदाचं 17 वं वर्ष आहे. कोरोनात पण मी त्यांना भेटायला आलो होतो, पण तेव्हा सुप्रिया सुळे यांना भेटून माघारी गेलो होतो. पण दरवर्षी पाडव्याला पवार साहेबांना भेटायचे, हे आमच्या मनात कायम असते,” असे मेहबुब शेख यांनी म्हटले.
पवार साहेबांच्या बाजूला जे उभे, तेच आमच्यासाठी ताई आणि दादा Sharad Pawar Diwali Padwa |
गोविंद बागेत खूप गर्दी होते, म्हणून मी काटेवाडीत पाडवा मेळावा आयोजित केला आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याविषयी विचारले असता मेहबुब शेख यांनी म्हटले की, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. पण दोन पाडवे करायची वेळ का आली, हे समस्त महाराष्ट्राला माहिती आहे. पवार साहेबांच्या बाजूला जे उभे आहेत, तेच आमच्यासाठी ताई आणि दादा आहेत. शरद पवार यांच्यासोबत असताना अजित पवारांचं चांगलं सुरु होतं. पण आता तशी परिस्थिती नाही. ही गोष्ट अजित पवार यांनाही समजली आहे. पण आता वेळ निघून गेल्याचे मेहबुब शेख यांनी म्हटले.
हे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचं यश Sharad Pawar Diwali Padwa |
बारामतीमध्ये गोविंदबाग आणि काटेवाडी येथे होत असलेले दोन दिवाळी पाडवे हे दिल्लीतील अदृश्य शक्तीचे यश आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ही महाशक्ती घर आणि पक्ष फोडते, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी सोन्याची मिठाई दादांचं तोंड गोड करण्यासाठी आणली आहे. अजित पवारांसाठी ही मिठाई बनवण्यात आली आहे. तर काही कार्यकर्ते गेल्या अनेक वर्ष पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामती मध्ये येतात अशाच एका कुटुंबातील तिन्ही पिढ्या एकत्र अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आल्यात आणि आम्ही अजितदादांसोबतच आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.