मोदी स्वत: सत्तेत आहेत आणि मला विचारतात की तुम्ही देशासाठी काय केलं..?- शरद पवार

नाशिक – नरेंद्र मोदी स्वतः सत्तेत आहेत आणि मला विचारतात की तुम्ही देशासाठी काय केले? पंतप्रधान मोदींनी सांगावे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केला.

संयुक्त महाआघाडीचे दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी निफाड येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील मालोजीराव मोगल, माधवराव बोरस्ते तसेच महाआघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘पाच वर्षांपूर्वी एक सरकार आले मात्र इथला विकास लुप्त पावला. या भागाचा कायापालट करू असे मोदींनी सांगितले होते पण पाच वर्षात कोणता विकास झाला सांगा? आता पुन्हा इथे खूप विकास करायचा आहे. महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांना मतदान करा आणि पुढील पाच वर्षांत या भागाचा चेहरा बदलून टाकू.’, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी शरद पवार यांनी शेतीच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘मोदी स्वतः सत्तेत आहेत आणि मला विचारतात की तुम्ही देशासाठी काय केले? मी आधुनिकेतचा विचार करतो. आज इथला शेतकरी द्राक्ष,सोयाबिन,डाळींब ही उत्पादने घेतो. परदेशात सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारे आपले राज्य आहे, त्यात नाशिकचा मोठा वाटा असतो. हे आघाडी सरकारच्या काळात झालेले काम आहे’.

पंतप्रधान मोदींनी सांगावे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? कांद्याला भाव मिळत नाही म्हणून इथे उग्र आंदोलन झाले. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कांदा उत्पादकांचे हाल होत असताना निर्यात बंदीचे आदेश दिले. कांद्याच्या किंमती जाणीवपूर्वक वाढू दिल्या.

लोकसभेत यासाठी काही खासदारांनी आंदोलन केले, मात्र त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. म्हणूनच तमाम शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे असतील तर इथे परिवर्तन होणे गरजेचे आहे आणि त्यामुळे या भागाच्या विकासासाठी धनराज महाले यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन शरद पवार यांनी दिंडोरीकरांना केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.