माढा : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यान शरद पवारांनी माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ED च्या कारवाईवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मला देखील ईडीची नोटीस आली होती. मी राज्य सरकारी बँकेचे पैसे काढल्याचे सांगण्यात आले होते. पण मी राज्य सहकारी बँकेचा सभासद देखील नव्हतो, तरी मला नोटीस आली. मी ईडीच्या कार्यालयाच्या जवळ गेलो त्यानंतर, अधिकारी आणि पोलीस प्रशासन म्हणले आमची चूक झाली.
त्यांनी मला हात जोडल्याचे म्हणत शरद पवारांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. गैर कारभार केल्यावर भीती वाटते मात्र ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नसल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
सरकारवर साधला निशाणा
दोन वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील 64 हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत.तसेच 62 लाख मुले राज्यात बेरोजगार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.