शरद पवारांनी दिल्लीत बोलावली बैठक; शिवसेना मात्र अलिप्त कारण…

मुंबई : देशात सध्या तिसऱ्या आघाडीचे वारे जोरात वाहताना दिसत आहे. कारण सत्ताधारी भाजप विरोधात आता सर्व विरोधक एकवटताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे.

शरद पवारांनी बोलावलेली बैठक  विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे  म्हटले आहे. तसेच  काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत मीडियाशी बोलत होते. तुम्हाला कुणी सांगितलं ही विरोधी पक्षाची बैठक आहे? या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव कुठे आहेत? त्यांची काय वेगळी तिसरी आघाडी आहे का? असा सवाल करतानाच ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची बैठक आहे. त्यापलिकडे या बैठकीचे महत्त्व वाटत नाही, असे राऊत म्हणाले.

आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होतील असे वाटत नाही. पवार मोठे नेते आहेत. विविध क्षेत्रातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात. काल माझं पवारांशी फोनवर बोलणं झालं. आजची बैठक ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची आहे. त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. फार फार तर मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे, असे म्हणता येईल, असेही त्यांनी सांगितले.

मोदी विरोधी, भाजप विरोधी असे शब्द वापरणं योग्य नाही. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष प्रबळ करणं हे गरजेचं आहे. पवार तेच करत आहेत. त्यामुळे मोदी विरोधी, भाजप विरोधी असे शब्द वापरणे चुकीचे आहे, असे सांगतानाच काँग्रेस, शिवसेनेशिवाय देशात तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.