Sharad Pawar – काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, त्यांनी निर्णय घेतला. त्याची चर्चा करण्याचे कारण नाही. बिनविरोध निवडणूक करावी, अशी मागणी करण्याचे कारण नाही. लोकशाहीत निवडणूक लढवायची असेल तर समोर कुणीतरी आहे, हे मान्य करून निवडणुकीत उतरावे लागते, अशी थेट भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मांडली. तसेच आम्ही उमेदवार उभा केला नाहीतर प्रचार करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले, आम्ही काँग्रेसला काहीही बोलण्याची गरज नाही. अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात आणि यशस्वी होतात. अजित पवार हे लोकांमध्ये सक्रिय होते. विकासाच्या कामात अजित पवारांचे लक्ष असायचे. Sharad Pawar अजित पवारांबद्दल लोकांमध्ये आदर आहे. दुर्दैवाने अजित पवारांचे अपघाती निधन झाले. याचे दु:ख आम्हा सर्वांना आहे. पवार कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नसल्याचा निर्णय आम्ही घेतला, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बारामतीत झालेल्या सुनेत्रा पवारांच्या सभेत बॅनरवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि शरद पवारांचा फोटो एकत्र होता. याबद्दल प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, माझा फोटो असेल तर ते चुकीचं आहे. या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला नाही. तसेच राहुरीतून प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्याची माहिती समजली. तनपुरे किंवा मोकाटे उभे राहतील, अशी चर्चा सुरू होती. तुम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय घ्यावा, असे मी सांगितले, अशी माहिती त्यांनी दिली.