Sharad Pawar at lalbaug Ganpati – सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तब्बल 30 वर्षांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे यावेळी त्यांचे जावई सदानंद सुळे त्यांची नात रेवती सुळे यांनीदेखील शरद पवारांसोबत दर्शन घेतले.
शरद पवार यांनी आत्तापर्यंत फक्त दोनवेळा लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. याआधी शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.
त्यानंतर करोना काळातही रक्तदान शिबिराचे आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळाने केले होते. त्यावेळीदेखील शरद पवार हे लालबागमध्ये आले होते. पण, करोना नियमावलीमुळे मंडळाच्या वतीने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली नव्हती.
फक्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी शरद पवार हे लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. दरम्यान, शरद पवार यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनालाही हजेरी लावली होती.
भाजपची टीका
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अशामध्ये आता शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराज आणि लालबागचा राजाची आठवण झाली. शरद पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे, म्हणजे फक्त ढोंगीपणा आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
तसेच, 40 वर्षांनंतर शरद पवार हे रायगडावर गेले होते. तसेच, ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर आता 30 वर्षांनी त्यांना लालबागच्या राजाची आठवण झाली. माझी गणरायाकडे एवढीच प्रार्थना आहे की, शरद पवारांना हिंदुत्त्वाबद्दल सुबुद्धी मिळो, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.