करिम लालाच्या नातवाने दिले पुरावे
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी करीम लाला याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात जात होत्या असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.याच वादात आता करीम लाला याच्या नातवाने त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. आपल्या कार्यालयात इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची भेट झाल्याचा फोटो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील करीम लाला याची भेट घ्यायचे असा दावा केला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
सलीम पठाण यांनी इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्यामधील भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी इतर राजकीय नेत्यांचे फोटोही शेअर केले आहेत. संजय राऊत यांनी इंदिरा गांधींसंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर सलीम पठाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार ? तसेच मंत्रालयात कोण बसणार ? हे अंडरवर्ल्ड ठरवत असे. जेव्हा हाजी मस्तान मंत्रालयात येत असे तेव्हा अख्खे मंत्रालय खाली येत असे. इंदिरा गांधीही पायधुनी येथे करीम लालाला भेटण्यासाठी आल्या होत्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
कॉंग्रेसने संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली होती. अशी वक्तव्ये यापुढे कुणाकडूनही खपवून घेतली जाणार नाहीत असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. कॉंग्रेसच्या नेत्यांकडून जाहीरपणे निषेध सुरु झाल्यानंतर संजय राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. आपल्या मनात इंदिरा गांधी यांच्याबद्दल आदरच आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांना इंदिराजी समजल्याच नाहीत, हे दुर्दैव असल्याचे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. राऊत यांच्या फटकेबाजीमुळे शिवसेनेची मात्र पंचाईत झाली आहे.