पळपुटे नेत्यांचा जनता समाचार घेतील – शरद पवार

नवी मुंबई: काही जण चुकीच्या वाटेवर जातील असे वाटले नव्हते, पण ते गेले. पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा समाचार लोक घेतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नवी मुंबईत आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले की, मी विधानसभेत पहिल्यांदा 1967 साली गेलो. त्यानंतर 52 वर्ष मी कोणत्या ना कोणत्या सदनात जातोय. यात 27 वर्षे मी विरोधी पक्षात होतो. पण मला काम करताना अडचणी आल्या नाहीत. विरोधी पक्षात आपण असतो तेव्हा अधिक काम करता येते, असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले ते सत्तेतून बाहेर गेल्यावर हे निर्णय लोकांमध्ये पोहोचले का? काही कमी राहील का? हे पाहायचो. मग पुन्हा सत्तेत गेल्यावर ते बदलायचे असे ठरवायचो, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात 16 हजार शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली त्यांच्यासोबत जाऊन बसणे योग्य नाही. सत्ता हातात आल्यावर रोजगार घालवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्याबरोबर संघर्ष करायचा काळ आहे, त्यांच्या पदराखाली जायचा नाही, असे पवार म्हणाले.
कोल्हापूर, सांगलीत पूर आला. शेती, व्यवहार उद्‌ध्वस्त झाले. आज तिथला बांधव संकटात आहे. तेव्हा त्यांच्या मागे उभ राहायचे, तर या काळात महाजनादेश यात्रा काढत आहेत, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

पुरानंतर मुख्यमंत्री काही तास तिथं जाऊन आले. मात्र त्यानंतर त्यांनी तिकडे ढुंकून पाहिले नाही. फक्त विरोधकांवर तोंडसुख घेत आहे. तुम्ही पाच वर्षात काय काम केले ते सांगा. फक्त विरोधकांवर टीका करतात याचा अर्थ यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असेही पवार म्हणाले.

आज जागरूक राहायची गरज आहे. कोणी गेले तरी चिंता करू नका. हे राज्य स्वाभिमानी लोकांचे राज्य आहे. लोक स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. महाराष्ट्रात लोकं मतदान करतील तेव्हा दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक घेऊन ज्यांनी तह केला आणि सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येऊन पळपुटेपणाची भूमिका घेत असतील तर लोकं समाचार घेतील, अशी टीका उदयनराजे यांचे नाव न घेता त्यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here