Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येत असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे तब्बल ४ खासदार शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. हे खासदार मराठवाडा आणि विदर्भातील असल्याचेही बोलले जात असून, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकलेल्या ८ जागांपैकी निम्मे खासदार या घडामोडीत सामील असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हे खरे ठरल्यास शरद पवारांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे टप्पे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विभाजन झाले होते. दरम्यान, या ताज्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, संबंधित खासदार नेमके कोण आणि ते प्रत्यक्षात पक्षांतर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत पातळीवर याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.