Sharad Pawar । बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्यावर ६ गंभीर वार करण्यात आले असून त्यातील एक घाव खोलवर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत सर्व स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी देखील या घटनेवर मत मांडले आहे. शरद पवार यांनी मत मांडत असताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज Sharad Pawar ।
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी महायुती सरकारवर या घटनेचे खापर फोडले. याविषयी बोलताना त्यांनी,”मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किती वाईट झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे? या भागात एका व्यक्तीची हत्या झाली आणि आता दुसऱ्यावर हल्ला झाला आहे, ही चिंताजनक बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे कारण जनता आता त्यांच्यासोबत आहे” असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्यावर संशय व्यक्त केला असून हा हल्ला पूर्वनियोजित कट होता का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तर या घटनेवर शिवसेनेचे यूबीटी खासदार संजय राऊत यांनीही सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाल्याचे म्हटले आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. तसेच सैफवरील हल्ला हा मोदींसाठी धक्का असल्याचे म्हटले. कारण पदमश्री किताबाने सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीवर हल्ला होणे हे सरकारचे अपयश असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, या घटनेवर मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना १५ आणि १६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफच्या वांद्रे येथील निवासस्थानी घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्यही उपस्थित Sharad Pawar ।
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. घटनेच्या वेळी अभिनेत्याव्यतिरिक्त कुटुंबातील काही सदस्यही घरात उपस्थित होते. सध्या मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा
“मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन…”; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संशय