कोरेगाव, (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खेड नांदगिरी तालुका कोरेगाव ज्येष्ठ कार्यकर्ते घनश्याम उत्तमराव शिंदे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नियुक्तीपत्र देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीर्घकाळ सभापतीपद भूषवलेली उत्तमराव शिंदे यांचे चिरंजीव असलेल्या घनश्याम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
खेड नांदगिरी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढवणार आहे. युवक कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणून जातीवादी पक्षांना धडा शिकवण्याचे काम करणार असल्याचे घनश्याम शिंदे यांनी निवडीनंतर सांगितले.
या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे माजी संचालक तानाजीराव मदने, कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अरुण माने, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे,
सदस्य श्रीमंत झांजुर्णे, बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव कुमुकले, विद्यमान सभापती ॲड. पी. सी. भोसले, किसनवीर कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, राजु भोसले, युवराज जगदाळे, नाना भिलारे, तुकाराम वाघ, नितीन लवंगारे आदींनी अभिनंदन केले.