भारताचे एडिसन – डॉ. शंकर आबाजी भिसे

थोर भारतीय शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे अर्थात “भारताचे एडिसन’ यांची 154 वी जयंती अज दि. 29 एप्रिल रोजी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय…

200 च्यावर निरनिराळे शोध लावणारे, 40 हून अधिक शोधांचे पेटंट घेणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या, तिरस्कार व्यक्त करणार्या अमेरिकन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणारे डॉ. शंकर आबाजी भिसे !

साधारण 1897मध्ये ‘इन्व्हेन्टर रिव्ह्यू अँड सायंटिफिक रेकॉर्ड’ या मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे हवं तेवढं वजन करून देणारं यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. तयार केलेले हे यंत्र त्यांनी त्या वाण्याला आवर्जून दाखवले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला.

छपाईतंत्राचा शोध चीनमध्ये चार शतकांपुर्वी लागला असला, तरी छपाईसाठी अक्षरांचे खिळे पाडणारी आणि त्यांची जुळणी करणारी यंत्रं दीडशे वर्षांपुर्वीपर्यंतही फारच संथगतीने काम करीत असत. एका मिनीटाला फक्त 150 अक्षरांची जुळणी व्हायची. मराठमोळ्या अशा शंकर भिसे यांनी आपले सारे लक्ष, शक्ती व जगावेगळी घडण असलेले त्यांचे तल्लख व चपळ डोके या संशोधनकार्यासाठी पणाला लावले. काही वर्षांतच त्यांनी मिनीटाला 1200 अक्षरांची जुळणी सहजगत्या करू शकणार छपाईयंत्र बनवण्याची किमया केली. हे यंत्र गतिमानतेबरोबरच गुणवत्ता व अचुकता यांचा सुवर्णमध्य गाठणारं असल्यामुळेच त्याची दखल परदेशातही घेतली गेली.

1910मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातलं एक भारतीय औषध फार गुणकारी ठरलं. या औषधाचं रासायनिक पृथ:करण त्यांनी करवून घेतलं आणि त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे, हे जाणलं. 1914साली भिसेंनी स्वत:च एक नवीन औषध तयार करून त्याला ‘बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरलं. पहिल्या महायुद्धात या औषधाचा अमेरिकन लष्कराने मोठय़ा प्रमाणावर वापर केला.

समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातले विविध वायू वेगळे करणारं यंत्र, जाहिराती दाखविणारं यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण आणि नोंदणी करणारं यंत्र, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्रे पाठविणारं यंत्र अशा अनेक यंत्रांचे शोध त्यांनी लावले. 1927 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डीएससी ही पदवी दिली. भिसे यांनी तयार केलेल्या ‘स्वयंचलित आगामी स्थानदर्शक’ यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आपोआप कळणार होतं. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरायला नकार दिला.

डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी 1898 मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशाप्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही.

सौर ऊर्जेवर चालणार्या मोटारीचा शोध 1918 सालीच लावून ते मोकळे झाले. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या सौरऊर्जेवर चालू शकतील अशा मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांचीच आहे, हे आपण आवर्जून लक्षात ठेवायला हवे. डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’ नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत. बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले.

29 एप्रिल 1927 या दिवशी- भिसे यांच्या 60व्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ‘अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. खरं तर 1908 सालीच युरोपीय व अमेरिकन नियतकालिकांनी भिसे यांना ‘इंडियन एडिसन’ हे बिरुद बहाल केलं होतं.

जागतिक दर्जाच्या ‘हु इज हु’ या संदर्भग्रंथात ‘भारताचे एडिसन’ असे म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. त्यावेळी 23 डिसेंबर 1930 या दिवशी भिसे यांनी आपले आदर्श असलेल्या थॉमस अल्वा एडिसन यांची त्यांच्या प्रयोगशाळेत भेट घेतली. अमेरिकेतल्या ‘हूज हू’ मध्ये समावेश झालेले भिसे हे पहिलेच भारतीय. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला. शिकागो विद्यापीठाने त्यांना सायको-अ‍ॅनालिसिसमधील डॉक्टरेट बहाल केली, तर माऊंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व दिले.

विज्ञान व संशोधनातले नोबेल प्राईज मिळावे, अशा तोडीचा हा माणूस होता. तो महाराष्ट्रात जन्माला आला. देशभरात गाजला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.