मेलबर्न – मार्क टेलरपासून मायकल क्लार्क अशा अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. मात्र, रिकी पॉंटिंग हा या सर्वांत आश्चर्यकारक निर्णय घेणारा कर्णधार असल्याची टीका ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पीन गोलंदाज शेन वॉर्न याने केली आहे. सोशल मीडियावरील एका लाइव्ह चॅट कार्यक्रमात वॉर्न बोलत होता. यावेळी इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचेही काही खेळाडू यात सहभागी झाले होते. यावेळी सर्वात आश्चर्यकारक निर्णय घेणारा कर्णधार कोण या प्रश्नावर वॉर्नने पॉंटिंगचे नाव घेतले.
ऍशेस मालिकेतील एका घटनेचे वॉर्नने कथन केले. इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील या अत्यंत महत्त्वाच्या कसोटी मालिकेतील एका सामन्यात बर्मिंगहमच्या मैदानावर नाणेफेक जिंकून पॉंटिंगने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक असते असा इतिहास आहे. त्या सामन्यातही खेळपट्टी भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांसारखी पूर्ण सपाट होती. संघात सर्व बलाढ्य फलंदाज असतानाही व यजमान इंग्लंडसमोर मोठी धावसंख्या उभारण्याची संधी असतानाही पॉंटिंगने हा निर्णय कसा काय घेतला याचे माझ्यासह सगळ्याच खेळाडूंना आश्चर्य वाटले. पॉंटिंगने हा निर्णय घेतला तेव्हा इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार नासिर हुसेनही हसला होता. अर्थात असे आश्चर्यकारक निर्णय घेण्याची पॉंटिंगची ही काही पहिलीच वेळ नव्हती. त्याने यापूर्वीही असे काही निर्णय घेतले आहेत.
मात्र, हा सामना ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्त्वाचा होता. एक निर्णय संपूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकतो असे म्हणतात तेच या सामन्यात घडले. इंग्लंडने केवळ 2 धावांनी हा सामना जिंकला. कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या कमी फरकाने जिंकलेला हा पहिलाच कसोटी सामना ठरला. या सामन्यातील विजयासाठी इंग्लंडने ही मालिका बरोबरीत सोडवली. हा सामना संपल्यावर सर्वच खेळाडू नाराज होते. मात्र, पॉंटिंगच्या चेहऱ्यावर कोणतीही नाराजी नव्हती, तो नेहमीप्रमाणे हसतमुख होता. या आठवणी काढल्या की आजही मला या निर्णयाचे वाईट वाटते, असेही वॉर्न म्हणाला.