शमशाद बेगम! हिंदी चित्रपटातील सर्वात महागड्या गायिकेच्या आंतरधर्मीय लग्नाचीही आगळी कहाणी!

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सरस गायक आहेत, जे अजूनही लोकांच्या मनावर राज्य करतात आणि लोक त्यांची गाणी मोठ्या उत्साहाने ऐकतात. अशाच एका महान गायिकेने ‘मेरे पिया गये रंगून’ आणि ‘कजरा मोहब्बत वाला’ ही गाणी गायली आणि हे गाणे कायमचे अमर केले. या गाण्यांना आपला आवाज देणाऱ्या गायिका शमशाद बेगम यांची आज जयंती आहे. त्यांचा काहीसा वेगळा पण मधुर आवाज अजूनही लोकांच्या कानात गुंजतो. भारतीय हिंदी सिनेसृष्टीतील शमशाद बेगम हे नाव संगीत प्रेमी कधीच विसरू शकत नाहीत. आपल्या कारकीर्दीत शमशादने अशी गाणी गायली जी चाहत्यांच्या मनात कायम घर करतील.

शमशाद बेगमचा जन्म 14 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांनी रेडिओद्वारे आपल्या गायनाची सुरूवात केली. 1937 मध्ये शमशाद बेगम यांनी लाहोर रेडिओवर पहिले गाणे सादर केले. त्यानंतर1944 मध्ये त्यांनी मुंबईत पहिले पाऊल ठेवले. यानंतर संपूर्ण जगाला शमशाद बेगम यांच्या आवाजाची जादू समजली. त्यांनी ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘लेके पेहला पेहला प्यार’, ‘मेरे पिया गाय रंगून’, अशी असंख्य सुपरहिट गाणी चाहत्यांना दिली.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत विविध भाषांमध्ये सहा हजाराहून अधिक गाणी गायली. शमशाद बेगम त्यांच्या काळातील सर्वाधिक मागणी असलेल्या प्लेबॅक गायकांपैकी एक होत्या आणि त्या भक्कम फी आकारत असत. बेगम दिसायलाही तितक्याच सुंदर होत्या. त्यांच्या सौंदर्यासमोर मोठ्या अभिनेत्री फिक्या ठरत. जेव्हा त्या गात होत्या, तेव्हा त्यांना चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफरही मिळाली होती, परंतु कुटुंबातील पुराणमतवादी विचारसरणीमुळे त्यांनी ही ऑफर नाकारली.

शमशाद बेगमचे लग्न बरेच वादग्रस्त ठरले. त्यांचे करियर बहरत असताना कुटुंबीय त्यांच्यासाठी मुलगा शोधत होते, परंतु शमशादने आपल्या जोडीदाराचा शोध पूर्ण केला होता. त्यांना स्वतःच्या प्रिय व्यक्तीशी लग्न करायचे होते. ही बाब 1934 सालची आहे. त्यावेळी देशात हिंदू-मुस्लिम दंगली होत होत्या. त्याच वर्षी शमशाद गणपतलाल बट्टोला भेटल्या. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. त्यांची दोन्ही कुटुंबे या लग्नाच्या विरोधात होती, परंतु त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले. शमशाद बेगमचे लग्न झाले होते तेव्हा त्या अवघ्या 15 वर्षांच्या होत्या.

कारकीर्दीत त्यांनी एकापेक्षा एक गाणी गायली. यामध्ये ‘ओ गाडी वाले गाडी धीरे हांक रे’ (मदर इंडिया), ‘कही पे निगाहे कभी पे निशाना’ (सीआयडी), ‘कभी आर कभी प्यार लागा तिरे-नजर’ (आर-पार), ‘मेरे पिया गया रंगून’ ‘(पतंगा),’ छोड बाबुलका घर ‘(बाबूल),’ कजरा मोहब्बत वाला ‘(किस्मत), ‘दूर कोई गाये’ (बैजू बावरा),’ ना बोल पीपी मोरे अंगना ‘(दुलारी) आणि’ एक दो तीन आजा मौसम है रंगीन’ (आवारा) सारख्या गाण्यांचा समावेश आहे.

चित्रपटांपासून दूर गेल्यावर शमशाद अज्ञातवासात राहिल्या. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळवले. 2009 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषणने सन्मानित केले. 23 एप्रिल 2013 मध्ये शमशाद बेगम यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.