नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज महंमद शमी याच्या पत्नीला कट्टरवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शमीची पत्नी हसिना जहॉं यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
हसिना गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. तसेच सोशल मीडियावर स्वतःचे अक्षेपार्ह फोटो पोस्ट करत आहेत. त्यांना याबाबत अनेकांनी ट्रोलही केले होते. मात्र, आता कट्टरवाद्यांनी यात उडी घेत हसिना यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
अयोध्येत राम मंदिराचे भूमीपुजन झाल्यावर हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अभिनंदनाचा संदेश पोस्ट केला होता. त्यावरुन नवा वाद सुरू झाला असून त्यामुळेच त्यांना धमक्या देण्यात येत आहेत.
राम मंदिराच्या निर्माणाला प्रारंभ झाल्यावर अनेकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा संदेश दिले. मात्र, हसिना यांनीही दिलेल्या संदेशामुळे कट्टरवाद्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतरच या धमक्या सुरू झाल्या. अखेर हसिना यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
हसीना व शमी यांच्यातही अनेक महिन्यांपासून कौटुंबीक वाद सुरु आहेत. त्याबाबत तसेच वैयक्तीक आयुष्याबाबतही हसिना यांनी केलेल्या पोस्टला टीकाकारांनी ट्रोल केले होते.