कराड – माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असणारे आमदार शंभूराज देसाईंचे विधानसभेतील आणि विधानसभेच्या बाहेरील कार्य मी जवळून पाहिले आहे.आपल्या मतदार संघातील कामांचा सपाटा लक्षात घेता ते आमदारकीची हॅट्रीक पूर्ण करण्यासाठी त्यांना भरघोस मताधिक्क्यांनी पुन्हा विजयी करा, असे आवाहन राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे केले. कोपरखैरणे नवी मुंबई येथील शेतकरी समाज हॉलमध्ये आ. शंभूराज देसाईंच्या प्रचारार्थ पाटण तालुका मुंबई रहिवाशींचा जाहिर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ना. नरेंद्र पाटील, आ. शंभूराज देसाई उपस्थितीत होते.
ना. एकनाथ शिंदे म्हणाले, पाटण तालुका मुंबई रहिवाशींची गर्दी पाहून येणाऱ्या 24 तारखेला पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे तिसऱ्यांदा आमदार होवून हॅट्रीक मारणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघातील जनतेशी नाळ जोडलेले असून लोकप्रतिनिधी आणि आपला आमदार कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शंभूराज आहेत. शिवसेना पक्षाची बाजू सभागृहात योग्य प्रकारे मांडण्याची भूमिका शंभूराज देसाई पार पडतात म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी त्यांच्यावर विधानसभेतील पक्षप्रतोदाची जबाबदारी दिली ती त्यांनी लिलया पेलली.
ना. नरेंद्र पाटील म्हणाले, आमदार शंभूराज देसाई हे पाटण मतदारसंघाचे तडफदार आमदार आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वांधीक निधी पाटणला आणला आहे. याचा अनुभव मी स्वत: लोकसभेची निवडणूक लढताना घेतला आहे. प्रत्येक गाववस्तीवर त्यांनी या पाच वर्षात विविध विकासकामे केली आहेत.जी विरोधकांना जमली नाहीत. कामासाठी विधानसभेत भांडणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे म्हणूनच मतदारसंघाचा कायापालट करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
आ. शंभूराज देसाई म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मला चांगले मताधिक्य देवून आपण सर्वांनी मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. जनतेच्या भरघोस पाठींबामुळेच मतदारसंघात न होणारी अनेक कामे करण्यासाठी तसेच प्रलंबीत अनेक कामांना मला भरघोस असा 1806 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणता आला. यावेळी सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, नगरसेविका दमयंती आचरे यांची भाषणे झाली. उपस्थितांचे स्वागत डी. आर. पाटील यांनी केले.