कोयनानगर : महायुतीच्या मंत्रिमंडळाची स्थापना व विस्तार गुरुवारी होत असून या मंत्रिमंडळात पाटणचे शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पाटण तालुक्याला पुन्हा लाल दिवा व राज्य मंत्रिमंडळात महत्वाची खाती मिळणार असल्याने कार्यकर्त्यांचे जथ्येचे जथ्ये हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर त्यांच्या नातवाला बांधकाम खाते मिळण्याची खात्री व्यक्त होत आहे. चौफेर विकासकामांच्या जोरावर पाटण विधानसभा मतदारसंघात विजयी चौकार मारणारे तत्कालीन पालकमंत्री शंभूराज देसाई उच्चांकी मताधिक्याने विजयी झाले. अडीच वर्षांपूर्वी सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या शंभूराज देसाई यांचा उत्पादन शुल्क मंत्रिपद तसेच ठाणे व सातारा या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री देऊन सन्मान करण्यात आला.
शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा गाडा हाकताना राज्याच्या उत्पन्नात विक्रमी भर करुन विभागाला वेगळी ओळख निर्माण करुन देण्याचे काम केले. पालकमंत्री म्हणून सर्वात जास्त निधी या जिल्ह्यांना देण्याची कामगिरी त्यांनी केली. याची प्रचिती पाटण तालुक्यात येते. नव्याने महायुतीच्या स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात आपल्या कामामुळे वेगळी ओळख निर्माण केलेल्या उत्पादन शुल्क या खात्याबरोबर आ. शंभूराज देसाई यांना सार्वजनिक बांधकाम या खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बांधकाम विभाग मिळण्याची शक्यता…
महाराष्ट्राचे पोलादी पुरूष लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना कोयना धरणाच्या निर्मितीवेळी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर त्यांच्या नातवाला सार्वजनिक बांधकाम खाते मिळण्याची शक्यता आहे.