शिरूर : शिरूर तालुक्यातील आण्णापूर येथील शंभु भाऊसाहेब गिऱ्हे याची अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षीच पोलीस दलात निवड झाली आहे .त्याने लहानपणापासून शासकीय नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याच्या वडिलांचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. वडिलांचे अधुरे राहिलेले स्वप्न शंभुच्या रुपाने पुर्ण झाले आहे.
वडिलांचे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने अनेक कठीण परिस्थितीवर मात करत हे स्वप्न सत्यात उतरवले असून त्याची नुकतीच ग्रामीण पोलीस दलात निवड झाली आहे. तो यापुर्वी एस.आर.पी .एफ गट क्रमांक दोन पुणे येथे पण भरती झाला होता. २८ दिवस ट्रेनिंग केल्यानंतर पुणे ग्रामीणचा पोलिस भरतीचा रिझल्ट लागल्यानंतर सिलेक्शन झाल्याने त्याने एस .आर. पी .एफ चा राजीनामा दिला आहे.
अण्णापूर येथील स्थायिक गरीब कुटुंबातील शंभू भाऊ गिऱ्हे याचे चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे.तर माध्यमिक शिक्षण गावातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले. पुढील शिक्षणाची फारशी सुविधा नसताना त्याने उच्च माध्यमिक शिक्षण ज्ञानगंगा विद्यालय, शिरूर येथे घेत शासकीय नोकरी करण्याचे ध्येय निश्चित केले होते.
त्याचे वडील भाऊसाहेब गिऱ्हे यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही त्यांना पोलीस होता आले नाही. वडिलांचे हे स्वप्न शंभूने पोलीस होऊन पूर्ण केले आहे. मुलाच्या या जिद्दीचे समाजाने गावाने तोंड भरून कौतुक केले असून शिरूर तालुक्यातील आण्णापुर गावात या यशाने शंभूचा आनंद गगनात मावेनासा झाला तर उतरोउत्तर अशीच यशाची शिखरे सर करणार असल्याचे शंभू गिऱ्हे यांनी सांगितले आहे.