श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी आमदार लहू कानडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षातर्फे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, अमृत धुमाळ, अरुण नाईक यांच्या समवेत आ.कानडे यांनी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी अर्ज स्वीकारला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील उत्सव मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्यानंतर मंगल कार्यालयापासून रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी आ. कानडे, अविनाश आदिक उघड्या जीपमधून रॅलीत सहभागी झाले होते.
रॅली सिद्धिविनायक चौकातून गिरमे चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक व सय्यद बाबा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र पवार, सलीम शेख, मल्लू शिंदे, अशोक कारखान्याचे माजी संचालक लाल पटेल,
हिम्मत धुमाळ, बाळासाहेब मुंगसे, प्रा. कार्लस साठे, अॅड. रावसाहेब करपे, उद्योजक अंकुश कानडे, माजी नगरसेवक अशोक कानडे, सतीश बोर्डे, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, युनुस पटेल, विजय शेलार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.