शक्ती मिल प्रकरण : बलात्काराच्या गुन्ह्यात फाशी योग्य नाही

पहिल्या गुन्ह्यात आरोपी अपीलात निर्दोष सुटले तर गुन्ह्याची पुनरावृत्ती कशी?

मुबंई  – एखाद्याची हत्या करणे अथवा शरिराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे हत्येपेक्षा बलात्काराचा गुन्हा मोठा नसल्याने त्यासाठी फाशीची शिक्षाही योग्य नाही, असा युक्तीवाद शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वतीने ऍड. युग चौधरी यांनी उच्च न्यायालयात केला.

मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी एका छायचित्रकार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तिघा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा ठोठावताना न्यायालयाने केंद्र सरकारने कलम 376(ई) या कायद्यात दुरुस्ती करून आरोपीने दोनवेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशी शिक्षा ठोठावण्यांच्या तरतुदीची अंमलबजावणी केली. त्या विरोधात विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांनी केंद्र सरकारने कलम 376(ई) मध्ये केलेल्या दुरूस्तीलाच आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहित-ढेरे यांच्या खंडपीठासमोर दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्यावतीने ऍड. युग चौधरी यांनी युक्‍तीवाद केला. बलात्कारचा गुन्हा हा हत्येच्या गुन्ह्यापेक्षा नक्कीच मोठा नाही, याचा पुर्नरच्चर करताना सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने पहिल्या गुन्ह्यात दोषी ठरविल्यानंतर काही मिनिटातच न्यायालयाने दुसऱ्या गुन्ह्यात दोषी ठरविले. तर पहिल्या गुन्ह्यात आरोपी अपीलामध्ये निर्देष सुटले, तर दुसऱ्या गुन्हा पुनरावृत्तीमध्ये कसा काय बसू शकतो. आणि त्यात फाशीची शिक्षा कशी काय ग्राह्य धरता येईल, असा सवाल करून आरोपींचा युक्तीवाद संपविला. आता बुधवारी होणा-या सुनावणीवेळी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग युक्तिवाद करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.