शक्ती मिल गँगरेप : आरोपींची फाशीची शिक्षा रद्द; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने शक्ती मिल परिसरात २२ वर्षीय छायाचित्रकारांवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तीन दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. आरोपींनी केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चात्ताप केल्याबद्दल ते जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

२२ ऑगस्ट २०१३ रोजी मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले आहे.

न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने विजय जाधव, मोहम्मद कासिम शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची पुष्टी करण्यास नकार दिला. त्यांच्या फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत रुपांतर केले आहे.

या सुनावणी दरम्यान कोर्ट म्हणाले की, “या घटनेने समाजाला खूप मोठा धक्का दिला. बलात्काराची प्रत्येक घटना ही खूप मोठा गुन्हा आहे. यामुळे फक्त शारिरीक नाही तर मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. पीडितेच्या सन्मानावर हा हल्ला असतो. पण घटनेवर चालणारं कोर्ट लोकांच्या मतांच्या आधारे शिक्षा ठरवू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा असून, फाशी हा एक अपवाद आहे. त्यामुळे योग्य विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. अशा घटनांमध्ये प्रक्रिया विसरुन चालणार नाही.”

“आरोपींनी दिलेली कबुली आणि पीडित तरुणी वासनेचा विषय होता अशी टिप्पणी यावरून त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी वाव नसल्याचं दिसून येतं. आरोपींच्या कुटुंबीयांना घर सोडावं लागलं होतं याची दखल घेऊ शकत नाही,” असंही कोर्टाने सांगितलं. कोर्टाने यावेळी आरोपी पॅरोल किंवा फर्लोसाठी अर्ज करु शकत नाहीत. असेही कोर्टाने नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.