26 डिसेंबरला मंचकी निद्रेस होणार सुरुवात
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे असल्याची माहिती तहसीलदार सौ. योगिता कोल्हे यांनी दिली आहे.
तत्पूर्वी २६ डिसेंबर पासून रात्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. ८ दिवसांची मंचकी निद्रा संपवून ३ जानेवारी रोजी मध्यरात्री तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल तर दुपारी १२ वाजता घटस्थापना करण्यात येईल.
९ दिवस चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी मातेच्या विविध अलंकार पुजा मांडण्यात येतात. तसेच शारदीय नवरात्र महोत्सवाप्रमाणे ९ दिवस विविध धार्मिक विधीचे आयोजन करण्यात येते.
शाकंभरी नवरात्र च्या निमित्ताने ३ जानेवारी पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना, नित्योपचार पूजा. दपारी १२ वाजता घटस्थापना, रात्री छबिना, ४ जानेवारीला नित्योपचार पुजा,रात्री छबिना , ५ जानेवारी रोजी नित्योपचार पूजा, तुळजाभवानी मातेची रथ अलंकार पूजा, छबिना, ६ जानेवारी रोजी नित्योपचार पुजा,तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार पूजा, छबिना निघणार आहे.
७ जानेवारी रोजी सकाळी जलयात्रा, नित्योपचार पुजा, दुपारी तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार पूजा, छबिना होईल. ८ जानेवारीला नित्योपचार पूजा,तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार पुजा, छबिना , ९ तारखेला नित्योपचार पुजा, तुळजाभवानी मातेची महिषासूरमर्दिनी अलंकार पुजा, छबिना संपन्न होईल.
१० जानेवारीला शाकंभरी पोर्णिमा असून नित्योपचार पूजा, दुपारी होमकुंडात विधी, घटोत्थापन व रात्री छबिना मिरवणूक. ११ जानेवारीला नित्योपचार पूजा,दुपारी अन्नदान महाप्रसाद, व रात्री छबिना काढण्यात येणार आहे.या नवरात्र काळात राज्यातील देवी भक्त मोठ्या संख्येने तुळजाई नगरीत दर्शनासाठी येत असतात.