पुणे – पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहे.
भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, पुण्यातील या राजकीय घटनेवर आता मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी शैलेश टिळक म्हणाले की, पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु वेगळा निर्णय घेतला गेला. पक्षाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे परंतु मुक्ता टिळक यांच्या कामावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनात खंत आहे. कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. कोणताही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एखाद्याच्या घरातील व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. मीही उमेदवारीची मागणी केली होती”. अशी भावना त्यांनी व्यक्त करून दाखवली.