कोल्हापूर – लक्ष्मी विलास पॅलेस हे राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले वास्तू संग्रहालय आजपासून लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. या संग्राहलयास भेट देणारी प्रत्येक व्यक्ती राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज व्यक्त केला.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व इंद्रजित सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, शाहू महाराजांचा समतेचा विचार लोकांसमोर जावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. शाहू राजांचा समतेचा आणि सर्वधर्म समभाव हा विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी स्मृती शताब्दी वर्षात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे असून हे विचार भावी पिढीला प्रेरणा देणारे आहेत. वास्तू संग्रहालयाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे विचार, कार्य आणि इतिहास नव्या पिढीसमोर नक्कीच जाईल. या वास्तु संग्राहलयाच्या पुढच्या टप्प्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.