शाहू-आंबेडकरांचे विचार भारतीय समाजाची नवी मांडणी करणारे : एन.डी.पाटील

कोल्हापूर : शाहू-आंबेडकरांनी महाराष्ट्राला नवा विचार दिला. हा विचार भारतीय समाजाची नवी मांडणी करणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. एन.डी पाटील यांनी केले. येथील ‘संवाद’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘माणगाव परिषदेची शंभरी आणि आजचं सामाजिक वास्तव’ या पुस्तिकेचे प्रकाशन एन.डी. पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला लेखक सिद्धार्थ कांबळे यांच्यासह समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, डॉ.संभाजी बिरांजे उपस्थित होते. या पुस्तिकेची प्रस्तावना ज्येष्ठ विचारवंत समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांनी लिहिली आहे.

प्रा. पाटील म्हणाले, माणगाव परिषदेच्या अध्यक्षपदावरून डॉ.बाबासाहेबांनी केलेल्या भाषणाचा गाभा लक्षात घेतल्यास शाहूराजांनी त्यांना दिलेल्या संधीचे महत्त्व लक्षात येते.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, माणगाव परिषदेला शंभर वर्षे पूर्ण झालेल्या काळात आजचे सामाजिक वास्तव सिद्धार्थ कांबळे यांनी नेमकेपणाने मांडले आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या विचाराचा जागर करणाऱ्या वर्तमान महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ अशा एन डी पाटील यांच्या हस्ते होणे ऐतिहासिक आहे.

पुस्तकाच्या लेखनामागील भूमिका मांडताना सिद्धार्थ कांबळे म्हणाले, आज जातीअंताऐवजी प्रत्येक जात ही जातिवंत होत आहे, हे गंभीर आहे. या मानसिकतेमुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येऊन महापुरुषांच्या विचाराला तिलांजली दिली जात आहे. यावर चिंतन होणे गरजेचे आहे. माणगाव परिषदेची शंभरी केवळ एक इव्हेंट म्हणून साजरी न होता सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने यावर विचार व्हावा, ही पुस्तिका लेखनामागील भूमिका आहे.

“डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमर रहे!”

समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी जेव्हा एन डी पाटील यांना सांगितले की, ‘माणगाव परिषद आणि आजचं सामाजिक वास्तव’ या पुस्तिकेचे तुमच्या हस्ते प्रकाशन करावयाचे आहे. तेव्हा एन.डी. पाटील बेडवर उठून बसत मोठ्या उत्साहाने “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे ” असे उद्गारले. हा प्रसंग अत्यंत भावनिक तर होताच, त्याचबरोबर त्यांच्या आजवरच्या चळवळीशी ते किती प्रामाणिक आहेत, हे दर्शविणारा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.