नवी दिल्ली – गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेले भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांना बिहार मधे विधान परिषदेचे सदस्यत्व दिले जाणार आहे.
भागलपुरचे खासदारपद भुषवलेले शहानवाज हुसेन यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून स्थान मिळवले होते. पण त्यांना सन 2019 साली खासदारकीचेही तिकीट नाकारण्यात आले होते. बऱ्याच प्रतिक्षेनंतर त्यांना आता राज्यपातळीवरील स्थान देण्यात आले आहे.
बिहार विधान परिषदेसाठी भाजपने ज्या सहा जणांची यादी आज जाहीर केली त्यात त्यांच्या नावाचा समावेश आहे. येत्या 28 जानेवारीला बिहार विधान परिषदेच्या 12 जागांसाठी निवडणुका होत आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला तेथे सहा जागा मिळणार आहेत. त्यामुळे हुसेन यांची विधान परिषदेवरील निवड पक्की मानली जात आहे.