राजेंद्र घाडगे : चोराडे गावाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार
पुसेसावळी – शहीद सुरेश पिसाळ युवापिढीसाठी प्रेरणास्थान असून युवा पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र घाडगे यांनी केले.
चोराडे (ता. खटाव) येथील शहीद स्मृतीस्मारकातील शहीद जवान सुरेश पिसाळ पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. सदस्य जितेंद्र पवार, वीरबंधु रमेश पिसाळ, नवल थोरात, सुहास पिसाळ, प्रमोद गायकवाड, नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
घाडगे म्हणाले शहीद सुरेश पिसाळ स्मृतीस्मारक समितीला सदैव सहकार्य करण्यास कटिबद्ध असून चोराडे गावच्या विकासासाठी विविध विकासयोजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करु, शहीद सुरेश पिसाळ यांनी देशासाठी दिलेले बलिदान अजरामर असून युवा पिढीने त्याचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे. युवा पिढीसाठी सैन्यदलात तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत मोठ्या संधी उपलब्ध असून युवकांनी त्याचा फायदा करुन घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी जितेंद्र पवार, नवल थोरात, सुहास पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कृष्णत पिसाळ, सुखदेव पिसाळ, आबासो काशीद, नितीन कुलकर्णी, महेश घार्गे, नंदकुमार घार्गे, चोराडे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व आभार सुहास पिसाळ यांनी केले.