शाहीन बाग आंदोलकांचा अमित शहांच्या घरावर मोर्च्याचा प्रयत्न

भेटीचे आश्‍वासन मिळाले, पण आंदोलनाची परवानगी नाही

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात शाहीन बागेमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलक महिलांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा मोर्चा निम्म्या वाटेवरच अडवण्यात आला.

अमित शहा यांच्या भेटीचे आश्‍वासन दिले गेल्यावर या मोर्चातील आंदोलक महिला मागे फिरल्या. अमित शहा यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याची पोलिसांची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी नाकारली. अमित शहा यांच्या निवासासमोर आंदोलन करण्यासाठी मागितली गेलेली परवानगीही पोलिसांकडून मिळू शकली नव्हती.

त्यामुळे या आंदोलनकर्त्या महिलांना शाहीन बागेमध्ये परत फिरावे लागले. मात्र आपले आंदोलन सुरू राहिल. तसेच आंदोलनादरम्यान हिंसचार आणि अनाचार होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा ठाम निर्धार आंदोलक महिलांनी व्यक्‍त केला आहे.

गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आंदोलक महिलांनी शिष्टमंडळ पाठवावे. त्या शिष्टमंडळाला गृहमंत्र्यांची भेट घेऊ दिली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र या सर्व महिलांनी एकत्रितपणे शहा यांच्या भेटीचा आग्रह कायम धरला. त्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र आता आंदोलकांची आणि गृहमंत्र्यांची भेट घडवण्याबाबत काय केले जाऊ शकेल, याचा विचार केला जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

“अमित शहा यांच्याशी सर्वांसमक्ष चर्चा केली जाईल. आम्ही “एनआरसी’ आणि “सीएए’ मागे घेण्याबाबत त्यांच्याकडून लेखी आश्‍वासन घेणार आहोत.’ असे आंदोलकांमधील एका ज्येष्ठ महिलेने सांगितले.

गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान शहा यांनी शाहीन बागेतील आंदोलकांशी चर्चेची तयारी दर्शवली होती. “सीएए’बाबत शंका असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून भेटीची वेळ निश्‍चित करावी. पुढील तीन दिवसात चर्चेसाठी आपण उपलब्ध होऊ असे शहा म्हणाले होते.

“सीएए’ आणि “एनआरसी’विरोधात आंदोलन करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शाहीन बागेत महिलांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनावर भाजप नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या आंदोलनाला दहशतवादी आणि देशविरोधी आंदोलनही संबोधले गेले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.