सातारा – शहापूर पाणीयोजनेच्या वितरण व्यवस्थेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी तपासणी व दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेतले. या कामामुळे यशवंत गार्डन टाकीवरून नकाशपुरा व मल्हार पेठ परिसराला होणारा पाणीपुरवठा बंद राहिला. गुरूवारी दि. 30 रोजी गणेश टाकी, बुधवार नाका टाकी, घोरपडे टाकी, गुरूवार टाकी व यशवंत गार्डन या टाक्यांद्वारे सकाळ व दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सातारा शहराला कास व शहापूर या योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कास ही शहराची सर्वात जुनी पाणीयोजना आहे. पंपहाऊस अथवा जलवाहिनीत एखादा अडथळा निर्माण झाल्यास बऱ्याचदा पाणीवितरण व्यवस्थेवर परिणाम होतो. अशा प्रकारच्या घटना होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून पंप हाऊस, वितरण नलिका यांची तपासणी व दुरुस्ती केली जाते. बुधवारी शहापूर योजनेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, गुरूवारी दि. 30 रोजी गणेश टाकी, बुधवार नाका टाकी, घोरपडे टाकी, गुरूवार टाकी व यशवंत गार्डन या टाक्यांद्वारे सकाळ व दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बोगदा ते नगरपालिका कार्यालय, डोंगर भागात पाणीपुरवठा करणारी पंपिंग लाइन बंद राहणार असल्याने या भागाचा सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. शुक्रवारपासून शहापूरचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.