मुलाला सोडवण्यासाठी शाहरुखची धडपड; आता चक्क भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार न्यायालयात बाजू

मुंबई : बॉलिवुड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अजूनही जामीन मिळाला नाही त्यामुळे त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढतच आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आता आर्यन खानने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख खान मात्र धडपड करताना दिसत आहे. त्यासाठीच त्याने आर्यनची बाजू मांडण्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता चक्क भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आर्यन खानची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल म्हणजेच एजीआय मुकुल रोहतगी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत  आहे. आज उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये त्याची ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी कायम केली होती. त्यामुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला होता.

दरम्यान, येत्या १ नोव्हेंबरपासून न्यायालये दिवाळीमुळे सुट्टी असताना बंद राहणार आहेत. पुढचे दोन आठवडे न्यायालय बंद राहणार असल्यामुळे या तीन दिवसांत आर्यन खानला जामीन न मिळाल्यास त्याचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम थेट १५ नोव्हेंबरपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे आता मुकुल रोहतगी यांच्याकडे आर्यन खानचे वकीलपत्र सोपवण्यात आले आहे.

२९ ऑक्टोबरला कोर्टाचे कामकाज सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर ३० आणि ३१ ऑक्टोबरला शनिवार आणि रविवार असल्याने कोर्ट बंद असेल. तर १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या काळात दिवाळीच्या सुट्टीनिमित्ताने न्यायाधीश हजर नसतील. त्यामुळे आजच्या सुनावणीत किंवा येत्या ३ दिवसात आर्यनच्या जामीन अर्जाचा निकाल जाहीर न झाल्यास आर्यन खानला कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जाता येणार नाही. १५ नोव्हेंबरपर्यंत त्याला जेलमध्येच रहावे लागेल.

आजच्या सुनावणीत आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला गेल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल. तसेच एनडीपीएस न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयाकडून  जामिनावरील निर्णय १५ नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.