मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.
दोन दिवसात या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पण गेल्या महिन्याभरापासून या सिनेमावर बहिष्कार घाला अशी मोहिम चालवणारा एक वर्ग सोशल मीडियावर जोरदार अॅक्टिव्ह झाला होता. पण बहिष्काराची भाषा करणाऱ्या या गँगला शाहरुख खाननं चांगलीच धोबीपछाड दिल्याचं प्रत्यक्ष सिनेमा प्रदर्शित झाल्यावर दिसून आलं आहे. त्यामुळं आता ट्विटरवर #BoycottGang हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करतो आहे.
‘पठाण’ने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ज्याप्रकारे रेकॉर्ड केले आहेत, त्याच प्रमाणे पहिल्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत 19.67 कोटी रुपये जमा केले आहेत. सिनेमाने पीव्हीआरमध्ये 9.40 कोटी, आयनॉक्समध्ये 7.05 कोटी, सिनेपोलिसमध्ये 3.90 कोटींची दमदार कमाई केली आहे. ऍडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत सुद्धा सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात अभिनेता शाहरुख खान सोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.
सध्या सोशल मिडियावर या सिनेमाविरोधात बहिष्काराची भाषा करणाऱ्या लोकांना ‘बॉयकॉट गँग’ असं संबोधत हा ट्रेंडही व्हायला लागला. या संदर्भातील अनेक ट्विट देखील आता व्हायरल होताना दिसत आहेत. काही जणांनी तर पठाण या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद बेशरम रंग गाण्यावरुन वाद निर्माण झाल्यामुळेच मिळाला असल्याचं बोललं आहे.