दुबई – इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स फ्रॅंचायझीचा मालक असलेला नाइट रायडर्स ग्रुप वेगाने आपले पंख पसरवत आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या सह-मालकीच्या गटाने चौथी टी-20 लीग फ्रॅंचायझी घेतली आहे, जी आगामी यूएई टी-20 लीगमध्ये अबू धाबीवर आधारित असेल.
शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जुही चावलाचे पती जय मेहता यांची मालकी असलेल्या नाईट रायडर्स ग्रुपने अबू धाबी फ्रेंचायझीचे मालकी हक्क मिळवले आहेत. त्यानंतर आता अबू धाबी हा संघ अबू धाबी नाईट रायडर्स या नावाने ओळखला जाणार आहे. याआधी नाईट रायडर्स ग्रुपने कॅरेबियन प्रीमियर लिगमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्स या फ्रेंचायझीचे मालकी हक्क मिळवलेले आहेत. तसेच यूएसएमधील मेजर लीग क्रिकेटमध्येदेखील नाईट रायडर्स ग्रुपने गुंतवणूक केलेली आहे.
रायडर्स ग्रुपने फ्रेंचायझीचे मालकी हक्क मिळवल्यानंतर यूएई टी-20 लीगने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार आम्ही नाईट रायडर्स या ब्रॅंडचा जागतिक पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहोत. यूएई टी-20 लीगचा एक भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. नक्कीच यामध्ये आम्हाला यश मिळेल, असे शाहरुख खानने म्हटले आहे.