#व्हिडीओ : शाडू मातीच्या मूर्ती वापरास प्रोत्साहन देणार

पुणे – गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे नदी, तलाव यासारख्या जलस्रोतांचे प्रदूषण होते. ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर येथे शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. या प्रयोगाला यश मिळून आज कोल्हापूरमध्ये सर्वाधिक शाडू मातीच्या मूर्तींचा वापर होतो. हाच प्रयोग पुण्यातही राबवून तो यशस्वी करण्याचा मानस असल्याचे, मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देण्यासाठी दैनिक “प्रभात’ वृत्तसमूहातर्फे यंदा “ग्रीन गणेशा’ हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील सहभागी झाले असून, “पर्यावरणपूरक गणेशोत्सव-काळाची गरज’ या विषयावर खेडकर यांनी दैनिक “प्रभात’शी संवाद साधला.

खेडकर म्हणाले, “जलस्रोतांचे प्रदूषण ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी शासकीय स्तरावर विशेषत: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे केवळ मंडळाच्या एकट्याचे काम नसून, यासाठी जनसहभागही अतिशय महत्त्वाचा आहे. शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच प्रदूषण रोखता येईल.’

आगामी गणेशोत्सवात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी केला पाहिजे. घराघरांमध्ये, सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या लहान आकाराच्या मूर्तींची स्थापना करावी, उत्सवादरम्यान निर्माण होणारे निर्माल्य नदीत न फेकता, त्याची शास्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे या माध्यमातून नदीचे प्रदूषण रोखण्यास आपण मोठी मदत करू शकतो, असे खेडकर यांनी सांगितले.

स्वयंप्रेरणेने केली जाणारी गोष्ट प्रभावी ठरते
प्रदूषण रोखण्यासाठी कायदे आहेत. वेळप्रसंगी मंडळाकडून त्या कायद्यांचा वापर करून दोषींवर कारवाईदेखील केली जाते. मात्र, कायद्याच्या धाकामुळे केली जाणारी गोष्ट आणि स्वयंप्रेरणेने केली जाणारी गोष्ट या दोन्हींमध्ये मोठी तफावत आहे. जेव्हा एखादी गोष्ट स्वयंप्रेरणेने केलीजाते त्यावेळी ती अधिक प्रभावी ठरते. त्यामुळेच जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंप्रेरणेने प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले, पर्यावरणपूरक गोष्टींचा अवलंब केल्यास जलप्रदूषण रोखण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असेही खेडकर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)